Obesity

BLOGSLifestyleObesity

लठ्ठपणा…जिव्हाळ्याचा विषय

Obesity-

लठ्ठपणा…जिव्हाळ्याचा विषय

 

 

वजन कमी करण्यासाठी काय करत नाही आपण? आहार नियमन (डाएटिंग), व्यायाम! झुम्बा, पिलेट्स, नृत्याचे वेगवेगळे प्रकार सगळ सगळं! वजन कमी करण्यासाठी काहीही

करायला आपण तयार असतो. लठ्ठपणा किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त वजन असणे हा बरेचदा विनोदाचा विषय असतो, पण तो तेवढाच गंभीरही आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर

आरोग्यासंबंधीच्या गुंतागुंतीत भर पडते. वजन वाढण्याची कारणे काय, असे विचाराल तर धावपळ, ताण, व्यायामाचा अभाव, जंक फूड, फास्ट फूड, चटपटीत खाण्याची सवय,

आवश्यकतेपेक्षा जास्त खाण्याची सवय, दिवस-रात्र झोपण्याचे प्रमाण जास्त, सतत काही खाण्याची, चघळत राहण्याची सवय, संप्रेरकांचे (हार्मोन्स) असंतुलन, विशेषतः थायरॉइड,

पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसिज (पीसीओडी), रात्री जड जेवण, कोल्ड ड्रिंक्सचे सेवन, बीअर व इतर मद्यपान, मांसाहाराचे जास्त प्रमाण, अनुवंशिकता, पचन कमकुवत असणे,

बद्धकोष्ठता, खूप जास्त आराम असणे किंवा अजिबात ताण नसणे आदी आदींमुळे वजन वाढते.

 

माझ्याकडे ३५ वर्षांची एक महिला आली होती. त्यांचे वजन तेव्हा शंभर किलो होते. त्यांच्याकडे वजन वाढण्याची अनुवंशिकता आहे. शिवाय त्यांना खाण्या-पिण्याची आवड होती.

संप्रेरक असंतुलन, अपचन या समस्या होत्या. होते काय की अपचनामुळे आहाररस निर्माण होत नाही. यामुळे यकृताद्वारे रंजक पित्ताचे कार्य व्यवस्थित होत नाही. पर्यायाने

रक्तनि​र्मिती नीट होत नाही. मांसधातूचे पचन होत नाही. परिणामी मासधातूची आणि मेदधातूची वृद्धी होती. त्या मांसाची संपूर्ण शरीरावर, विशेषतः नितंब, पोट, मांड्या आणि दंड

यावर संचिती होते. यावर औषध योजना करताना आहार-विहारावर नियंत्रण ठेवून विशेषत्वाने पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी औषध द्यावी लागतात. त्याव्दारे मांस व मेदधातूचे

पचन करावे लागते.

 

त्या महिलेसाठी पंचकर्माची योजना केली. पहिल्या आठवड्यात उदवर्तनम् केले. म्हणजे मेदविलयन करणाऱ्या औषधीयुक्त द्रव्यांनी आणि चुर्णांनी रोमरंध्रांच्या विरुद्ध दिशेने सतत

४५ मिनिटे मसाज केला. सोबत काढ्यांची बस्ती दिली. यामुळे मलप्रवृत्ती बरोबर झाली व उदवर्तनामुळे मेद विलयन होऊन शरीराच्या बाहेर मेद पडू लागला. पहिल्या आठवड्यात

जवळजवळ चार किलो वजन कमी झाले. दुसऱ्या आठवड्यात पुन्हा उदवर्तनम केले. सोबत काढा व स्नेहाची बस्ती दिली. एकूण वजन ९० किलो झाले. चौथ्या आठवड्यात, एक

दिवस तेल व एक दिवस पावडर मसाज केले. बस्ती दिली. पुढे धारा करण्याचे ठरवले. पूर्ण मेद व मांसविलयन व पाचनद्रव्यांचा काढा करून तो कोमट असा पूर्ण शरीरावर सोडला व बस्ती पण दिली. यामुळे वजन ८० किलोपर्यंत आले व उपचार थांबवले. आवश्यकता असल्यास याहीपेक्षा वजन कमी करता येते. पण शरीरावर सुरकुत्या पडण्यासारखे दुष्परिणाम

होऊ नयेत म्हणून थोडे दिवस थांबून उपचार करणे योग्य ठरते. अभ्यांतर चिकित्सेत, जठराग्नी वाढवून पचन करण्यासाठी औषध दिले. सोबत मांस व मेद विलयन व पाचनासाठी

त्रिफळा गुग्गुळ, मृतसंजीवनी, अयस्कृती, पुनर्नवासव, दाडीमाष्टक चूर्ण, अमृत गुग्गुळ, गुळवेल सत्व अशी औषधे दिली. वजन कमी करण्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे.

जड जेवण नको, दिवसा झोपू नये, व्यायाम करावा, सकाळी ३०-४५ मिनिटे पायी फिरायला जावे किंवा जॉगिंग करावे, रात्री शतपावली करावी, जेवणानंतर लगेच झोपू नये, रात्रीचे

जेवण हलकेच असावे, शक्यतोवर लवकर झोपावे. जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. जेवणाच्यामध्ये घोटभर पाणी घेता येईल. जेवणाच्या आधाही पाणी ​पिऊ नये. वजन कमी

करण्याच्या काळात पिण्यासाठी कोमट पाणी असावे. सूंठसिद्ध पाण्याचा उपयोग केल्यास जास्त चांगले. प्राणायाम व योगासने करावी.