Abhyangam Massage

Abhyangam Massage

अभ्यगंम्‌

post-4-1

अभ्यगंम्‌

दिवाळी म्हटले की सगळीकडे उजळलेले दिवे, स्वच्छ , रंगरंगोटी करुन अगदी नव्यासारखं केलेले, रांगोळ्यांनी सजलेले आणि रोषणाईने झगमगलेले घर असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. सगळ्या घरांमधून खमंग फराळाचा घमघमाट, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी सगळं सगळं प्रसन्न करणारं. प्रत्यक्ष दिवाळीत तर काही विचारायलाच नको! मला आठवतं, लहानपणी नरकचतुर्दशीला पहाटे उठायचं खूप जीवावर यायचं. थंडी किती!! पण आई रात्री झोपतानाच तंबी द्यायची आणि सकाळी उठवताना म्हणायची, “उठा रे! नाही तर नरकात जाल.” आणि नरकात जायच्या भीतीने आम्ही सगळी भावंड निमूट उठून डोळे चोळत बसायचो तोवर ही आम्हाला पाटावर बसवून, औक्षवण करुन, तेल उटणं लावून स्नान करायला पिटाळायची! मग तेल-उटणं लावलेल्या अंगावर कुडकुडवणार्‍या थंडीत ते कढत्‍ पाणी म्हणजे स्वर्गच वाटायचं! वाटायचं बरं झालं लवकर उठलो, नरकात जाणं टळलं बाबा!! थोडं मोठं झाल्यावर कळलं त्याला अभ्यंग स्नान म्हणतात. आणि डॉक्टर झाल्यावर तर त्या अभ्यंगाचं वेगळं रुप, वेगळ महत्त्व कळलं.

दिवाळीत आपण जे अभ्यंग स्नान करतो ते तसं वरवरचं. शास्त्रापुरतं, नावापुरतं तेल लावून लगेच त्यावर उटणं लावून स्नान करुन आपण मोकळे होतो. खरं तर अभ्यंगम्‌ असतं ते शरीराला आणि मनाला स्वच्छ करण्यासाठी. म्हणून ते तेवढ्याच निगुतीने, व्यवस्थित वेळ देऊन, घाई-गडबड न करता, शास्त्रीय पद्धतीने करायला हवं. तेव्हा त्याचा तेवढाच गुणही दिसेल.

आपल्याकडे वैदिक काळापासून अभ्यंगमचे प्रचलन आहे.  शरीरात बल, लवचिकता, हालचाल करण्याची क्षमता वाढावी, स्मृतिवर्धन व्हावे म्हणून प्राचीन काळी मनुष्य अभ्यंगम करीत असे. अभ्यंगममुळे वय वाढण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होते, त्वचेचे आणि आतील ऊतकांचे पोषण होते, दोषांचे संतुलन साधले जाते तसेच आरोग्य सुधारते व आयुर्मान वाढते. वार्‍यामुळे पानांचे घर्षण होते, झर्‍यातील पाण्याने दगडांचे घर्षण होते म्हणजे एक प्रकारे मसाज होते तसेच अभ्यंगममुळे शरीराचे मसाज आणि टोनिंग केले जाते.

खरे अभ्यंगम्‌ कसे केले जाते ते पाहू या. एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्याचा विचार करुन एका विशिष्ट दाबाने, विशिष्ट दिशेने औषधी तेल शरीरावर लावण्याची क्रिया म्हणजे अभ्यंगम.

अभ्यंगम ही प्राचीन तैल-चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदातील ही सगळ्यात अधिक प्रमाणात पुनरुज्जीवन करणारी चिकित्सा पद्धती आहे. पारंपारिकरीत्या, मसाज करण्यासाठी प्रशिक्षित दोन व्यक्ती एकमेकांशी मेळ साधत, रक्ताभिसरण आणि मर्म बिंदूंना अनुसरुन ४५ मिनिटे मसाज करतात.  शरीरातील विषद्रव्य कमी करणारे औषधीयुक्त तीळाचे किंवा केरमचे तेल आवश्यकतेनुसार निवडले जाते. मसाज सामान्यपणे बसलेल्या, झोपलेल्या, उजव्या कुशीवर, डाव्या कुशीवर, पालथे पडलेल्या अशा शरीरमुद्रांमध्ये केले जाते.

ही चिकित्सा पद्धती, वयाच्या विविध टप्प्यांवर उपयोगी ठरणारी आणि वयाच्या त्या-त्या टप्प्यांशी संबंधित सामान्य आजारांवर उपचारासाठी उपयोगी आहे. अभ्यंगम्‌मुळे वेदनांपासून मुक्तता मिळते, रक्ताभिसरण सुधारते, ताण कमी होतो, चांगली झोप येते, लवचिकता वाढते, अकडलेले स्नायु शिथिल होतात, संधिवतामुळे येणारी सूज कमी होते. या मसाजमुळे, सांधे आणि ऊतकांमध्ये खोलवर जमा झालेले विषारी द्रव्य मोकळे होऊन नैसर्गिकरीत्या शरीरातून बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेसाठी प्रणालीत सोडले जातात.

मसाजसाठी कोमट तेल वापरले जाते. कोणते तेल वापरायचे हे आयुर्वेदिक तज्ज्ञ ठरवतात. मसाज झाल्यावर औषधीयुक्त वाफ दिली जाते. अभ्यंगम्‌चे फायदे:

 • रक्ताभिसरण सुधारते
 • संपूर्ण शरीराचे पुनरुज्जीवन होते
 • त्वचा सुंदर, तजेलदार होते
 • वय वाढण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो
 • शांत झोप लागते, चैतन्य निर्माण होते आणि ताण कमी होतो
 • प्रतिकारशक्ती वाढते
 • विषद्रव्य बाहेर टाकले जातात

 

नियमितपणे अभ्यंगम्‌ केल्यास

 • पंचेंद्रिय व्यवस्थित कार्य करतात, केस काळे, लांब व मजबूत होतात
 • दृष्टी चांगली होते, चांगली झोप येते, त्वचेचा पोत सुधारतो, चमक येते. त्वचेला पोषण मिळते
 • रक्तदाब कमी होतो
 • सांध्यांची लवचिकता वाढते आणि हालचालीचा आवाका वाढतो
 • शांतपणे विचार करण्याची क्षमता आणि सृजनक्षमता वाढते
 • ताण कमी होतो, शरीरातील कडकपणा जातो आणि शरीर शिथिल होण्यास मदत होते
 • मन व शरीरातील समन्वय वाढतो

उत्तम परिणाम मिळण्यासाठी दर आठवड्यात अभ्यंगम्‌ करायला हवे.

 

दिवाळी म्हणजे हिवाळाच. या काळात अग्नि प्रदीप्त झालेला असतो. जठराग्नीत वाढ झालेली असते. जे खातो त्याने शक्तीवर्धन होते. मानसिक बळही वाढते. म्हणून आयुर्वेदाचा उपयोग करुन रसायन चिकित्सा करुन शरीर शक्तीची वाढ करावी व सोबतच पंचकर्म करुन शरीर शुद्धी करुन घ्यावी. शरीर शुद्धी म्हणजे शरीरातील विष द्रव्य बाहेर काढणे. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने केलेले अभ्यंगम्‌ व स्वेदनाला पर्याय नाही.

अभ्यंगम्‌ केल्यावर सुवासिक उटण्याने स्नान करावे. उटण्याने त्वचेवर्ल मृत पेशींचा थर निघतो, त्वचा तजेलदार होते, पुनरुज्जीवीत होते. सुगंधामुळे मानसिक प्रवृत्ती सुधारते, उत्साह वाढतो. एकूणच प्रक्रियेमुळे थकवा निघून जातो आणि ताजेतवाने वाटते.

 

मग या दिवाळीत स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि अभ्यंगम्‌चा अनुभव घ्या. खूप छान वाटेल.

 

डॉ. नितेश खोंडे