BLOGSGout

वयबंधन झुगारणारा गाठिया वात

642x361_SLIDE_3_Gout_Symptoms

वयबंधन झुगारणारा गाठिया वात

 

न संपणारी धावपळ, प्रचंड धकाधकीचे जीवन, अतिनिद्रा किंवा निद्रेचा अभाव, जेवणानंतर लगेच व्यायाम करणे किंवा पोहणे, खूप जास्त प्रवास, विशेषतः पाय लोंबकळत ठेवून प्रवास, बाइक किंवा इतर टू-व्हीलरवर खूप प्रवास, कडधान्य व डाळींचा खूप जास्त वापर, प्रथिनयुक्त आहाराचे जास्त सेवन, मांसयुक्त आहाराचे सेवन, मद्यपान, संप्रेरक असंतुलन, मोठ्या प्रमाणावर वेदनाशामकांचे सेवन आणि याच्या जोडीला वाढता ताण, पोषणमूल्यांचा अभाव, फास्ट फूड व जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन यामुळे शरीरक्रियेत बदल होऊन गाठिया वात (गाऊट) या वातारोगाची सुरुवात होते.

या वातरोगाला वयाचे बंधन नाही. चार-पाच वर्षांपूर्वी माझ्याकडे आईबरोबर १९ वर्षांचा एक मुलगा आला होता. त्या मुलाचे वजन त्यावेळी १०५ किलो होते. त्याला सांध्यांमध्ये, विशेषतः हाताच्या व पायाच्या बोटांच्या सांध्यात वेदना होत्या. खरे तर सगळ्याच सांध्यांमध्ये वेदना आहेत आणि संपूर्ण शरीर अकडले आहे, असे तपासताना माझ्या लक्षात आले. त्याच्यावर तत्पूर्वी बहुतांश प्रकारचे उपचार झाले होते. अगदी एमआरआयपासून सगळ्या चाचण्याही झाल्या होत्या. मी रिपोर्ट्स पाहिले तेव्हा युरिक अॅसिड वाढलेले आढळले. त्या मुलाची नाडीही वात आणि पित्तावर चालत होती. लहान सांध्यांमध्ये वेदना, शरीर अकडलेले, युरिक अॅसिड, नाडी यावरून निदान करायला वेळ लागला नाही…गठिया वात!

मी दोघांनाही परिस्थिती समजावून सांगितली आणि आजार पूर्ण बरा होण्यासाठी सहा ते आठ महिने लागतील याचीही कल्पना दिली. बोलता बोलता स्तब्ध झालो. कारण तो मुलगा आणि त्याची आई, दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. आतापर्यंत झालेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाचा तो परिपाक होता. उपचारासाठी एक महिना केरळीय पंचकर्म आणि पोटातून औषधं अशी योजना मी त्यांना सांगितली. दोघांनीही संमती दर्शवली आणि उपचाराला सुरुवात केली.

पहिल्या दिवशी अभ्यंगम व स्वेदनम केले. दुसऱ्या दिवसापासून एलाकिडी सुरू केली. त्याला नस्यम व बस्तीची जोड दिली. विशिष्ट औषधं आणि आवश्यक त्या औषधी तेलांनी पूर्ण शरीरावर एलाकिडी केली. यामुळे शरीरातील विषद्रव्य व युरिक अॅसिड बाहेर काढण्यास मदत झाली. ज्या सांध्यांमध्ये युरिक अॅसिड साठले होते, तिथून ते बाहेर काढण्यास या क्रियेची मदत झाली. पहिल्या आठवड्यात त्या मुलाला जवळपास ४० टक्के आराम मिळाला. मात्र काही प्रमाणात पाठीचे दुखणे असल्याने पिडीचिल दिले. नाडीला अनुसरून ४-५ लिटर तेल संपूर्ण शरीरावर टाकले. यानंतर थकवा जाणवला तरी शक्तिवर्धन झाले. पाठदुखी आणि सांधेदुखी दोन्ही कमी झाले.

तिसऱ्या आठवड्यात साधी पोडीकिडी केली. यामुळे सांधेदुखी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. बस्ती व नस्यममुळे शरीरातील विषसंचार बाहेर टाकला गेला आणि वातही कमी झाला. यावेळेपर्यंत वाताची सगळी लक्षणे आणि दुखणे थांबले होते. तरी पण हा त्रास पुन्हा उद्‍भवू नये म्हणून एक आठवडा आणखी उपचार केले. या आठवड्यात फक्त अभ्यंगम् व स्वेदनम् केले. अभ्यांतर चिकित्सा करताना, औषधी द्रव्यांमध्ये विषारी द्रव्य बाहेर काढणाऱ्या औषधांची रचना केली. वातवृद्धी कमी करणारी औषधे दिली. युरिक अॅसिडचे पाचन करण्यासाठी व ते बाहेर काढण्यासाठी औषध योजना केली. त्यानंतर काही विरेचक औषधेही वापरली. प्रथिनयुक्त आहार, काही डाळी, दुधाचे व आंबवलेले पदार्थ बंद करण्यास सांगितले. संपूर्ण उपचारामुळे शरीरातील दोष नाहिसे झाले आणि सोबतच जवळजवळ सहा किलो वजन कमी झाले. तेव्हापासून आतापर्यंत त्या मुलाला कोणताही त्रास नाही.

 

 

0
Leave a Comment