Spine pain

पाठदुखी

back pain

पाठदुखी

 

 

‘कंबर मोडणे’ हा आता वाक्प्रचार न राहता मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार झाला आहे. हे दुखणे फक्त कंबरेपुरते सीमित नाही. त्याचा विस्तार होऊन आजची जीवनशैली आणि कामाचे बैठे स्वरुप यामुळे पाठदुखी हा एक सहज आढळणारा आजार झाला आहे. सर्वेक्षण केले तर ७० ते ७५% लोकांना पाठदुखीचा त्रास असल्याचे आढळेल. आणि या पाठदुखीचे स्वरुपही गंभीर आहे. धावपळ आणि तणावपूर्ण जीवनशैली, नि:सत्व आहार, शारीरिक व मानसिक ताण यामुळे आपला कणाच दुखावतो आहे.

एखादी वजनदार वस्तू उचलल्यामुळे मणक्याला मार लागणे, अस्थिक्षय किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होणे, लहान वयात खूप जास्त वजनदार दप्तराचे पाठीवर ओझे, सतत एका जागी, खुर्चीत जास्तीत जास्त वेळ बसणे, संगणकावर सतत काम करणे, कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खाच-खळगे, खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे, नेहमी पोट साफ न होणे, रात्री जागरण, चिंता, शोक, क्रोध इ., योग्य त्या आहार-रसाचे सेवन न केल्याने पोषणमूल्य कमी होऊन पाठीचा मणका कमजोर होणे, व्यायमाचा अभाव, खुर्चीत किंवा अन्यत्र बसण्याची मुद्रास्थिती चुकीची असणे अशा कारणांमुळे पाठदुखी किंवा कंबरदुखी उद्भवते. डोक्यातून निघणार्‍या हजारो तंत्रिका मज्जारज्जूमधून पाठीच्या मणक्यातील छिद्रातून शरीरात पसरतात. याच तंत्रिका संपूर्ण शरीरास संवेदना देण्याचे आणि डोक्यापर्यंत पोहचण्याचे काम करतात. म्हणजे संपूर्ण शरीराला संवेदना देण्याचे काम पाठीच्या मणक्यातून होत असते.

याशिवाय पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा आधार आहे. आपल्या शरीराची इमारत त्यावरच उभी आहे. त्यामुळे पाठीचे दुखणे किंवा कंबरदुखी खूप गंभीर आणि जीवघेणी असू शकते. पाठदुखी किती गंभीर असू शकते हे तुम्हाला माझ्याकडे आलेल्या या रुग्णावरुन लक्षात येईल.

पाठदुखीने त्रस्त, साधारण चाळीस एक वर्षांचे गृहस्थ माझ्याकडे आले होते. त्यांचे दुखणे इतके बळावले होते की ते उभे राहू शकत नव्हते, चालू शकत नव्हते की बसू शकत नव्हते. त्यांना कारमधून उचलून क्लिनिकमध्ये आणावे लागले होते. तपासणी करण्यासाठी ते झोपूही शकत नव्हते. त्यांच्या मणक्यात कॉम्प्रेशन होते, कंबरही खूप दुखत होती. मुंग्या येत होत्या, पाय जड झाले होते, पायात गोळे येत होते. तपासणी केल्यावर मणक्यातील कॉम्प्रेशनबरोबर हाडेही स्वस्थानी नव्हती. एमआरआय केल्यावर डिस्कही जागेवरुन हालली असल्याचे लक्षात आले. पेंटच्या कारखान्यात काम करणार्‍या या गृहस्थांना नोकरीवर जाणे अशक्यच झाले होते. त्यांनी मोठी रजाच घेतली.

हे दुखणे बरे करण्यासाठी दिड महिन्याचा उपचार करणे आवश्यक असल्याचे त्यांना समजावून सांगितले. पहिल्या आठवड्यात साधे मसाज, अभ्यंगम आणि पोटली मसाज केले. मसाज करण्यासाठी नाडीनुसार विशिष्ट परिणामकारक तेल वापरले. याबरोबरच नस्यम व बस्ती क्रियाही केली. नस्यममुळे नाकातून डोक्यात तेल जाऊन विषद्रव्य विरल होऊन बाहेर पडतात. मेरुरज्जुला स्थिरता व बल मिळते. तर बस्तीने वात कमी करते, त्यामुळे दुखणे कमी होते. हाडे मजबूत होतात आणि शरीरातील विषद्रव्य पोटातून बाहेर पडतात. पहिल्याच आठवड्यात त्या गृहस्थांमध्ये २०% सुधारणा दिसली. दुसर्‍या आठवड्यात कटीबस्ती दिली. यासाठी नाडीनुसार तेल बदलून वापरले. नस्यम आणि बस्ती सुरुच ठेवले. तिसर्‍या आठवड्यात कटीबस्ती, नस्यम आणि बस्तीबरोबर लेपन केले. या वेळेपर्यंत त्या गृहस्थांना ५५ ते ६०% बरे वाटू लागले होते असे म्हणायला हरकत नाही. चौथ्या आठवड्यात नस्यम व बस्तीच्या जोडीने पिडिचिन केले. पिडिचिनमध्ये ४ लिटर बल्यतेल शरीरावर सोडले व मसाज केले. पाचव्या अठवड्यात पोटली मसाज, नस्यम, बस्ती आणि पाठीत बळ आणाण्यासाठी नवराकिडी चिकित्सा केली. सहाव्या आठवड्यात कटीबस्ती, नस्यम, बस्ती, लेपन केले. या अवधीत उपचाराचा परिणाम होऊन त्या गृहस्थांना चालण्या-फिरण्यासाठी आधाराची गरज उरली नाही. मुंग्या येणे, जडपणा, गोळे येणे नाहिसे झाले.

या उपचारानंतर ४ दिवस विश्रांती घेऊन ते नोकरीवर पुन्हा रुजू झाले. यामध्ये उपचारांच्या जोडीला व्यायाम आणि पोटातून औषधांचीही योजना केली होती.  हाडे स्वस्थानी, पूर्वस्थितीत आणणे, मसाज करुन विकृति बर्‍या करणे, मांसपेशी, स्नायुंना स्थैर्य देणे, बल देणे, मेरुरज्जु मजबूत करणे, कशेरुकांना मजबूत करणे, पूर्वस्थितीत आणणे, पाठीच्या मणक्याची झीज भरुन काढणे गरजेचे होते. या सगळ्याचा विचार करुनच उपचार-योजना केली होती.

एरवीही पाठदुखीचा त्रास असणार्‍यांनी आठवड्यातून एकदा मसाज करावा, सतत खुर्चीत बसू नये, ४५ मिनिटे झाले की बैठक मोडावी. व्यायाम , योगासने करावी, पायी फिरायला जावे, शतपावली करावी, पाठीला झटका बसणार नाही याची काळजी घ्यावी. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे केल्यास पाठदुखी बळावणार नाही हे नक्की.

 

असह्य पाठदुखी

 

      ४ वर्षांपूर्वी कंबरदुखीने बेजार एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. सुरुवातीचे बोलणॆ झाल्यावर लक्षात आले की कंबरदुखीला निमित्त फक्त गाडीवरून जाताना बसलेल्या धक्क्याचे झाले. पण धक्का मात्र जबरदस्त बसला होता. धक्का बसल्यावर पाठ दुखणे, कंबर दुखणे सुरु झाले. एवढ्यावरच थांबले नाही. पायात चमका निघणे, मुंग्या येणे सुरु झाले. काही दिवसांनी उजव्या पायात कडकपणा आला. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी एमआरआय करायला सांगितले. एमआरआयमध्ये एल३-एल४-एल५ या मणक्यांमध्ये खूप जास्त दाब (कॉम्प्रेशन) आल्याचे स्पष्ट दिसत होते. उजव्या पायात रॅडिक्युलोपॅथी दिसत होती. म्हणून फिजियोथेरपी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण त्याने काही विशेष आराम किंवा फरक पडला नाही. त्यामुळे न्युरोसर्जनने शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानंतर लगेच त्यांचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन केल्यावर थोडे बरे वाटत होते. पण काही दिवसातच त्यांच्या दोन्ही पायातील संवेदना नाहीशा झाल्या. न्युरोसर्जनने पुन्हा शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. ती पण केली. पण विशेष आराम पडला नाही.

केरळीय पंचकर्माने ही समस्या बरी होऊ शकते असे त्यांना कळले आणि इथे कोण असे पंचकर्म करुन देते याचा शोध घेत ते माझ्याकडे येऊन पोहचले. पोहचले काय! त्यांना उचलूनच क्लिनिकमध्ये आणले होते. ऑपरेशन आणि त्यांच्या परिस्थितीला फक्त दिड महिना झाला होता. त्यामुळे केरळीय पंचकर्माने ते लवकर बरे होऊ शकतील असे मला मनापासून वाटत होते. म्हणून त्यांना औषधोपचारासाठी तीन ते साडे तीन महिने द्यावे लागतील असे सांगितले. त्यातले अडीच महिने पंचकर्मासाठी लागतील याची त्यांना कल्पना दिली.

पहिल्या दिवशी, अभ्यंगम व स्वेदन केले. दुसर्‍या दिवसापासून पुढे सात दिवस एलाकिडी केले. सोबत बस्ती व नस्यम सुरु केले. एलाकिडीमुळे रक्तसंचार वाढून विषाक्तता कमी झाली. सोबतच पाठीच्या मणक्यातील शिथिलता वाढली. दुसर्‍या आठवड्यात ४-५ लिटर तेलाने पिडिचिल केले. पिडिचिल करताना नाडी व दोषानुसार तेलाची निवड केली. यामुळे संपूर्ण शरीरातील वात कमी होऊन, रक्तसंचार वाढून स्नायु, मांसपेशी, मज्जारज्जू, कंडरा व शीरा सगळ्यांना मजबूती मिळण्यास मदत झाली. जोडीला नस्यम व बस्ती होतेच.

तिसर्‍या आठवड्यात नवराकिडी केले. यामध्ये बल्यद्रव्यांचा आणि नाडीनुसार, संवेदना प्राप्त करुन देणार्‍या औषधी द्रव्यांचा उपयोग केला. पुढे एकूण दोन आठवडे हाच उपचार केला. नस्यम ब बस्ती सुरुच ठेवले. पाचव्या आठवड्यात पुन्हा एलाकिडी, नस्यम, बस्ती केले. पाठीच्या कण्यावर विशिष्ट औषधी द्रव्यांचा लेप दिला. ही प्रक्रिया १५ दिवस केली.

सातव्या आठवड्यात पुन्हा नवराकिडी, नस्यम व बस्ती केले. नस्यममुळे डोक्यातील विषद्रव्यांचा संचार बाहेर पडला तसेच मेंदूच्या हालचाली वाढून बल मिळाले व त्यामुळे मज्जारज्जूला सुद्धा बल मिळाले व तो पुनरुज्जिवित होऊ लागला. तसेच बस्तीमुळे हाडांवर, वातावर, मज्जारज्जूवर एकत्रित कार्य झाले. या सगळ्यामुळे जवळपास ४ आठवड्यात पायांना संवेदना जाणवू लागल्या, हालचाल वाढली. आठव्या आठवड्यातही हेच उपचार केले. यामुळे आठव्या आठवड्याच्या शेवटी-शेवटी ते स्वतःच्या पायावर उभे राहून एक-एक पाऊल टाकू लागले. त्यांना ७०-८० टक्के आराम पडला.

नवव्या आठवड्यात पुन्हा पिडिचिल केले. औषधी द्रव्यांचा लेप पाठीला दिला. तसेच शिरोबस्ती पण केली. दहाव्या आठवड्यात थलपोडिचिल केले. अभ्यंगम व स्वेदन केले. पाठीच्या कण्याला लेपनही केले.

अभ्यांतर औषध रचनेत पाठीच्या कण्यावर, मज्जारज्जूवर व मेंदूवर कार्य करुन पाठीच्या कण्यातील स्निग्धता वाढवणार्‍या, मजबूती निर्माण करणार्‍या औषधी दिल्या.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ते गृहस्थ पूर्णपणे बरे झाले. त्यांना व्यवस्थित चालता येऊ लागले. आज ते सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.

 

पाठदुखी असल्यास

१) महायोगराज गुग्गुळाच्या २-२ गोळ्या तीन वेळा घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे वात

आणि कफ कमी होण्यास मदत होते.

२) सहचरादि कषाय टॅब्लेट २-२ गोळ्या तीनदा जेवणापूर्वी. यामुळे पाठीच्या कण्याचा स्तंभ दूर

होण्यास मदत होते.

३) पुनर्नवादी कषाय टॅब्लेट २-२ वेळा तीनदा. प्रकृती बलाबलानुसार दिल्या जातात. यामुळे इजा

झालेल्या ठिकाणची सूज कमी होण्यास मदत होते.

४) कॅल्सिप्लस टॅब्लेट – कॅल्शियमने हाडांची मजबूती वाढून मणक्याची मजबूती वाढते.

५) टॅब्लेट सर्विलॉन / सायटिलॉन / स्पाँडिलॉन / गंधतेल आवश्यकतेनुसार पोटातून दिले जाते.

याने पाठीच्या कण्यातील वंगण वाढते.

६) एखादा पाचक योग म्हणुन दीपन-पाचन-रोचन करणारी (चव आणणारी) औषधं दिली जातात.

त्यामध्ये विशेषत्वाने आमपाचक वटी, चित्रकादि वटी अशा प्रकारची औषधं दिली जातात.

सोबतच स्नायुंची आणि कंडरांची मजबूती वाढवणार्‍या अश्वगंधारिष्ट, अमृतारिष्ट,

मृतसंजीवनी, बलारिष्ट, दशमुलारिष्ट, दशमुलजिरकारिष्ट अशा औषधांचा उपयोग केला जातो.

७) बडीशेप, देवदार, रुईचा चीक, वचनाग (वत्स्नाग), हिंग, सैंधव यांचा लेप केला असता

अस्थिगत वात, कटीगत वात (कमरेचा वात / दुखणे), संधिगत वात यांचा नाश होतो.

८) अश्वगंधाचे चूर्ण तुप-साखरेचे अनुपान ठेऊन खावे (सोबत खावे).

९) सूंठ व एरंड बीज सोलून दोन्ही ९०-९० ग्राम. घ्यावे. साखर व तूप १८०-१८० ग्राम घ्यावे व

तुपामध्ये एरंडाची बीजे भाजून नंतर १ शेर दूधात (२५० मिलि.) सर्व आटवून खवा

झाल्यावर रोज शक्तीप्रमाणे ५-१० ग्राम खावे. याने कमरेतील वात निघतो.

१०) सूंठसिद्ध तेल रोज रात्री ५-१० मिलि. घ्यावे.

११) रेडिक्युलोपॅथी (पायात चमका, शिलका, मुंग्या येणे, जडपणा जाणवणे) जास्त असल्यास

एरंडाचे मूळ, रिंगणी, बेल, महांळुंग (मोठा नीम)

यांची मुळे घ्यावी. पाषाणभेद, सूंठ, मिरी पिंपळी यांचा कढा करुन त्यामध्ये जवखा, हिंग, सैंधव, एरंडेल तेल घालून सकाळ-संध्याकाळ हा

काढा सेवन करण्यास द्यावा.  याने मोठ्या प्रमाणावर पाठीचा वात आणि शूल कमी होण्यास मदत होते. हे औषध १५-३० दिवस घ्यावे.

 

घरगुती उपाय

 

१) गरम पाण्यात मीटः घालावे. त्यामध्ये टॉवेल बुडवून व्यवस्थित पिळून, पोटावर झोपून, त्या

टॉवेलने पाठ शेकावी. लगेच आराम मिळतो.

२) दररोज नारळ तेल किंवा सरसो तेल यामध्ये ४-५ लसणाच्या कळ्या टाकयच्या. कळ्या काळ्या

होईपर्यंत तेल गरम करुन त्याने पाठीला हलके मालिश करावे.

३) ओवा तव्यावर हलक्या आचेवर गरम करावा. थंड झाल्यावर थोडे चावून गिळून टाकावा.

नियमित सेवन केल्यास कमरेचा त्रास कमी होतो.

४) नरम गादीवर झोपू नये.

५) वातव्याधी कमी करण्यासाठी सहचर, देवदार, सूंठ यांचा काधा नियमित घ्यावा.

 

पाठदुखी जाणवताच वेळीच काळजी घेण्यासाठी डॉक्टर गाठणे इष्ट.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2

1 Comment

Leave a Comment